लिटन दास, महमुदुल्लाच्या खेळीने बांगलादेश मजबूत स्थितीत, भारताला विजयासाठी २५७ धावांचे आव्हान

IND vs BAN World Cup Highlights: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर सुरू असलेला विश्वचषक सामना रंजक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या फलंदाजांनी चांगली खेळी केली. बांगलादेशने निर्धारित ५० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर २५६ धावा फलकावर लावल्या. परिणामी भारताला विजयासाठी २५७ धावांचे आव्हान मिळाले आहे. 

या डावात बांगलादेशकडून सलामीवीर लिटन दास (६६ धावा) आणि तन्जीद हसन (५१ धावा) यांनी आक्रमक अर्धशतकी खेळी केल्या. महमुद्दुल्लाहनेही ३६ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ४६ धावांची उपयुक्त खेळी केली. तसेच यष्टीरक्षक मुश्फिकुर रहीमने मौल्यवान ३८ धावा जोडल्या.

भारताच्या गोलंदाजीवर नजर टाकायची झाल्यास, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी २ विकेट्स काढल्या. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवलाही एका फलंदाजाला बाद करता आले. मात्र भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर झाला. त्याचे षटक विराट कोहलीने पूर्ण केले.