वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाला जबर धक्का, महत्त्वाचा गोलंदाज झाला बाहेर

Mohammed Siraj Ruled Out Of ODI Series: टीम इंडिया आज वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India Tour Of West Indies) वनडे मालिकेला सुरुवात करणार आहे. पहिल्या वनडेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत, मात्र त्याआधीच मोठी बातमी आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) वेस्ट इंडिजमधून मायदेशी परतला आहे. सिराज हा टीम इंडियाचा मुख्य वेगवान गोलंदाज आहे. अशा परिस्थितीत हा संघासाठी मोठा धक्का ठरू शकतो.

ईएसपीएन क्रिकइन्फोने वृत्त दिले आहे की, टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज कॅरेबियनमधील वनडे मालिकेसाठी विश्रांती घेतल्यानंतर वेस्ट इंडिजमधून मायदेशी परतला आहे. सिराजला कसोटी मालिकेनंतर विश्रांती देण्यात आली आहे. सिराजने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील दोन्ही कसोटी सामने खेळले आणि त्रिनिदादमधील दुसऱ्या कसोटीतही त्याने पाच विकेट्सही घेतले होते.

मोहम्मद सिराजच्या जागी संघात कोणाला घेतले जाणार याबाबत निर्णय झालेला नाही. गुरुवारी पहिल्या वनडे सामन्यासह, भारताकडे आता जयदेव उनाडकट, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर आणि अनकॅप्ड (वनडे सामन्यात) मुकेश कुमार यांचा समावेश असलेली जबरदस्त वेगवान फळी आहे.