शरद पवार यांना एकदाही स्वबळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आले नाही; वळसे पाटील यांचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल

Dilip Valase Patil – शांत आणि संयमी स्वभाव अशी ओळख असणाऱ्या राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकारणाची चिरफाड केली. आपण शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा नेताही देशात नाही म्हणतो. पण मायावती, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होतात. त्यांच्या राज्यात एकहाती सत्ता आणतात. पण शरद पवार उत्तुंग नेते असूनही त्यांना राज्यात एकहाती सत्ता आणता आली नाही, असा थेट हल्लाच दिलीप वळसे पाटील यांनी चढवला आहे.

रविवारी पुण्यातील मंचर येथील जाहीर कार्यक्रमात दिलीप वळसे-पाटील म्हणाले, शरद पवार यांना एकदाही स्वबळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आले नाही. देशातील अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष पाहिले तर ते पुढे जात आहेत. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. आपल्याकडे शरद पवारांसारखे नेते आहेत. मात्र, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपले (राष्ट्रवादीचे) फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते.

दिलीप वळसे-पाटील म्हणाले, कोणाला माझ्याविरोधात ईडीची नोटीस सापडली तर आमदारकीचा लगेच राजीनामा देईल. राज्य सरकारमध्ये मी, अजित पवार व काही सहकारी सहभागी झालो. याचा अर्थ भारतीय जनता पक्षात गेलो असे अजिबात नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरच आहोत. ईडी, सीबीआय इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यामुळे राज्य सरकारमध्ये सहभागी झाले असा अपप्रचार केला जात आहे. ते चुकीचे आहे. तशी नोटीस कोणाला सापडली तर घेऊन या. आमदारकीचा लगेच राजीनामा देईल.