प्रपोज करताना मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हणायचंय ?, मग मुंबईतील विशेष न्यायालयाचा निकाल वाचूनच जा !

मुंबई : अलिकडच्या काळात महिला-तरुणींप्रमाणे अल्पवयीन मुलींची छेडछाड आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाणही अधिक आहे. अशाच एका पोक्सो कायद्याशी संबंधित प्रकरणात मुंबईतील विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. कोणत्याही मुलीला एकदा ‘आय लव्ह यू’ बोलणे हा गुन्हा ठरत नाही, याला संबंधित मुलीचा जाणीवपूर्वक केलेला अपमान म्हणता येणार नाही, तर ही प्रेमाची अभिव्यक्ती आहे, असे मत नोंदवत विशेष न्यायालयाने आरोपी 23 वर्षीय तरुणाची पोक्सोच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष न्यायाधीश कल्पना पाटील यांनी हा निकाल दिला आहे.

दरम्यान, एका रिपोर्टनुसार पीडित 17 वर्षीय मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणात वडाळा टीटी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपीने तिला ‘आय लव्ह यू’ म्हणजे ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे म्हटले होते. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीने मुलीकडे बघून डोळाही मारला होता तसेच मुलीच्या आईला धमकावले होते, असे विविध आरोप तक्रारीत करण्यात आले होते.

विशेष न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली. मात्र या प्रकरणातील आरोपीने वारंवार मुलीचा पाठलाग केला आणि तिला ‘आय लव्ह यू’ म्हटले, असे घडलेले नाही. आरोपीने पीडितेचा वारंवार पाठलाग करून ‘आय लव्ह यू’ म्हटलेले नाही. आरोपीने केवळ एकदा ‘आय लव्ह यू’ म्हटलेय. एखाद्या मुलीला एकदा ‘आय लव्ह यू’ म्हणणे ही प्रेमाची अभिव्यक्ती आहे. याला पीडितेच्या नम्रतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले गेले, असे म्हणता येणार नाही, असे नमूद करीत विशेष न्यायाधीश कल्पना पाटील यांनी आरोपी तरुणाची पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीच्या दोषसिद्धतेसाठी पुरेसे ठोस पुरावे नाहीत, असेही न्यायालय म्हणाले.