सरकारनं सर्व लाज शरम वेशीवर टांगलीय का ? ‘त्या’ व्हिडीओवरून चित्रा वाघ यांचा थेट सवाल

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बाम्हणी या गावामध्ये नुकताच एक डान्स हंगाम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात डान्स हंगामाच्या नावावर अश्लीतेचा कळस गाठण्यात आला होता. डान्स हंगामाच्या नावावर इथल्या कलाकारांनी अश्लील नृत्य केले. या अश्लील नृत्याचा व्हिडिओ नागपूर जिल्ह्यात वेगाने व्हायरल होत आहे.

हा प्रकार ज्या ठिकाणी सुरु होता त्याठिकाणी मुले-मुली अर्धनग्न होऊन अश्लील नृत्य करत आहेत. रात्रीच्या वेळी अश्‍लील डान्स पाहण्यासाठी तरुणांची खूप गर्दी दिसून येत आहे, सर्वात गंभीर बाब म्हणजे अश्लील डान्सची पोलिसांना माहिती नाही, स्थानिक पातळीवर तरुणांना आकर्षित करण्यासाठी जाहिराती देऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे.

दरम्यान, आता या सर्व प्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.त्या म्हणाल्या, राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे स्वप्न होतं की डान्स बार बंद करून चुकीच्या मार्गानं जाणा-या तरूणाईला योग्य दिशा दाखवावी… पण आत्ता महाविकास आघाडीकडून आणि सत्तेतील राष्ट्रवादीकडून त्यांच्याच स्वप्नांना तिलांजली देण्याचा प्रकार नागपूर ग्रामीण भागांत घडलाय….

यापूर्वी पुरोगामी महाराष्ट्रात जेवढे गोष्टी करणे अशक्य होत्या त्या सगळ्या या सरकारच्या छत्राखाली शक्य झाल्या आहेत… आणि ते ही शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेऊन सत्ता चालवणारे असताना सरकारच्या नाकाखाली महिलांना नग्न अवस्थेत डान्स करायला लावला जातोय … ते ही उघडपणे… सरकारनं, पोलिस यंत्रणेनं सर्व लाज शरम वेशीवर टांगलीय का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.