सुप्रिया सुळे यांनी केला मांसाहारी जेवणाचा फोटो शेअर; नेटकरी आणि मेटे समर्थकांनी केला संताप व्यक्त

Pune – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या सोशल मिडीयावर चांगल्याच सक्रीय असतात. अनेकदा त्या आपले अनुभव देखील सोशल मिडीयावर शेअर करत असतात. मात्र त्यांच्या काही पोस्टमुळे वाद देखील निर्माण झाले आहेत. अशीच एक त्यांची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सुळे यांनी या पोस्टमध्ये काही मांसाहारी पदार्थांचे फोटो शेअर केले आहेत. यावरून त्यांना लक्ष्य केले जात आहे.

नेटीझन्सने या फोटोंवरून टीका केली आहे. एका बाजूला हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरु असताना असे फोटो शेअर करणे योग्य नसल्याचे काहींचे म्हणणे आहे तर काहींच्या मते शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या निधनाची दुःखद घटना घडली असताना मासे खाण्याची पोस्ट टाकण्याची काय आवश्यकता होती असा देखील सवाल काहीजण करत आहेत. लोकांना सुळे यांच्या मांसाहारावर नव्हे तर टायमिंग वर आक्षेप असल्याचं देखील दिसून येत आहे.

दिवंगत विनायकराव मेटे यांच्या निधनामुळे संपुर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यावेळी सुप्रिया सुळे यांची ही कृती नक्कीच संताप आणणारी आहे असं काहींचे म्हणणे आहे तर काहींनी विनायक मेटे यांच्यासारखा लढवय्या नेता नियतीने हिरावून घेतला. टीव्ही वर प्रतिक्रिया देताना तुम्ही जी सहानुभूती दाखवली ती किती पोकळ होती तेच यातून दिसतेय. असं सांगत सुळे यांना लक्ष्य केले आहे.