भाजपच्या पाठींब्याने शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर कंगनाचा आनंद गगनात मावेना, कौतुक करत म्हणाली… 

मुंबई – महाराष्ट्रात इतक्या दिवसांच्या राजकीय उलथापालथीनंतर अखेर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करण्यात आले.  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुरुवातीला या सरकारमध्ये फडणवीस सहभागी न झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते मात्र वरिष्ठ  नेतृत्वाच्या आदेशानुसार फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे.

दरम्यान,  एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधीही झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) हिने आपल्या खास शैलीत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कंगनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर एक स्टोरी शेअर केली. ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि एक कौतुकाचा संदेश त्यात आहे.

कंगना म्हणते, ‘एकनाथ शिंदे यांची अत्यंत प्रेरणादायी अशी ही यशोगाथा आहे. आपला चरितार्थ चालवा म्हणून एकेकाळी रिक्षा चालवणारा (Rickshaw Driver) व्यक्ती आज देशातील एक महत्वाचा आणि सर्वाधिक ताकदीचा मुख्यमंत्री होतो. सर, तुमचे खूप अभिनंदन..’ अशा शब्दात कंगनाने शिंदे यांचे कौतुक केले आहे. तिच्या या पोस्टची सध्या भलतीच चर्चा सुरू आहे.