हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल !

बंगळुरू: हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही, असं सांगतानाच शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा अधिकार आहे. तेच निर्णय घेतील, असा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. तसेच या संदर्भातील याचिकाही कर्नाटक कोर्टाने फेटाळून लावली आहे.

न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती खाजी जयाबुन्नेसा मोहिउद्दीन यांचा समावेश असलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने युक्तिवाद ऐकल्यानंतर हे प्रकरण निकालासाठी राखून ठेवले होते. उडुपी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज फॉर गर्ल्सच्या सहा विद्यार्थिनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश केला होता. त्यानंतर विरोध सुरु केला होता. हा विरोध इतर जिल्ह्यांमध्ये पसरला आणि मोठा वाद निर्माण झाला. काही हिंदू विद्यार्थी भगवी शाल घालून येऊ लागल्याने तणाव निर्माण झाला होता.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण उडुपी येथील एका महाविद्यालयापासून सुरू झाले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सहा मुली हिजाब परिधान करून वर्गात आल्या आणि प्रत्युत्तर म्हणून हिंदू विद्यार्थी भगवे उर्पण घालून महाविद्यालयात आले. हळूहळू हा वाद राज्याच्या इतर भागातही पसरला, त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये तणाव आणि अनेक ठिकाणी हिंसाचार झाला.