ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध; चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

Pune – ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून, आगामी काळात समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अमृत महामंडळाच्या माध्यमातून अनेक संधी उपलब्ध होतील, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

ब्राह्मण महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आज भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले‌. यात प्रामुख्याने खुल्या प्रवर्गातील मागण्यांसह अमृत महामंडळाचाही समावेश होता. या सर्व मागण्यांचा सरकार सकारात्मक विचार करीत असून, अमृत महामंडळाचे कामही प्रगतीपथावर असल्याचेही नामदार पाटील यांनी सर्वांना आश्वास्त केले.

यावेळी ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे, मनोज तारे, राहूल आवटी, मयुरेश आरगडे, मदन सिन्नरकर, तृप्ती तारे,सुशील नगरकर, मिलिंद बर्वे, राजेश कुलकर्णी, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप सरकारच्या काळात राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी राहिला पाहिजे असा प्रयत्न झाला. त्यासाठी जो घटक आरक्षणाच्या कक्षेत येत नाही, त्या घटकाच्या विकासासाठी नवीन महामंडळाचा प्रस्ताव समोर आला. त्यानुसार अमृत नावाने एक महामंडळ तयार झाले. पण सरकार गेल्याने, सदर महामंडळाचे कामकाज बारगळले.

ते पुढे म्हणाले, अडीच वर्षानंतर पुन्हा राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आले असून, हे सरकार समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. अधिवेशनानंतर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक घेऊन, समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करु, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.