पुण्यात सेनेला खिंडार; अत्यंत निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या भोसले-साळी यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

पुणे – शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड करत राज्यातील सत्तांतर घडवले असून महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर आता राज्यात भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे गट असे सरकार आहे. या घडामोडीनंतर अनेक नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहेत.

दरम्यान, एका बाजूला या घटना घडत असताना पुण्यात देखील शिवसेनेतून आउटगोइंग सुरु झाले आहे. एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर शिवसेनेच्या युवा सेनेचे महाराष्ट्र सहसंघटक किरण साळी आणि सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी राजीनामा दिला आहे. साळी आणि भोसले यांचे पुण्यातील सेनेसाठी मोठे योगदान आहे.भोसले यांनी सर्वसामान्य नागरिकापर्यंत पक्ष पोहोचवला आहे त्याच प्रमाणे  साळी यांनी देखील पक्षवाढीसाठी मोठे काम केले आहे. या तरुण नेत्याने अनेक आंदोलनात सहभाग नोंदवला असून हिंदुत्वाला विकासाच्या राजकारणाची जोड देत नेहमीच राजकारण केले आहे.   अत्यंत निष्ठेने काम करणाऱ्या या दोन नेत्यांच्या राजीनाम्यामुळे सेनेत मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे.(Kiran Sali and Ajay Bhosale resigned from Shiv Sena).

दरम्यान, काल दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) थेट पुण्यात आले.यावेळी शिंदेशाही पगडी घालून एकनाथ शिंदे यांचे पुणे विमानतळावर स्वागत करण्यात आले. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, किरण साळी, अजय भोसले, विजय शिवतारे उपस्थित होते. हडपसर येथे त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि लगेच पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. यावेळीच साळी आणि भोसले राजीनामा देतील असं सांगितले जात होते.