नवनीत राणा यांनी दिले  मुख्यमंत्र्यांना निवडणूक लढवण्याचे आव्हान; पेडणेकर म्हणाल्या, तुझी लायकी तरी आहे का ? 

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून (Lilavati Hospital) डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी यांनी सिंहगर्जना केली. यावेळी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ओपन चॅलेंज (Open Challenge) दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी  महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात निवडणूक लढवावी, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढीन, असं राणा म्हणाल्या आहेत. एवढंच नाहीतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या(BMC Election) प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये दम असेल, तर माझ्याविरुद्ध कोणत्याही जिल्ह्यातून लढून दाखवा. मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणारच आहे. नारीशक्ती काय असते हे तुम्हाला दाखवून देऊ. तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही,” असं नवनीत राणा म्हणाल्या.  यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया देत नवनीत राणा जे बोलल्यात ते हल्लाबोल नसून त्यांची खाज आहे, अशी खरपूस टीका केली.

उद्धव ठाकरे हे त्यांच्या चांगल्या कामामुळे केवळ राज्यातच नाही तर देशातही अव्वल आले, ती खरी दोघांचीही पोटदुखी आहे, एकाचा भोंगा (Loudspeaker) आहे तर दुसऱ्याचा सोंगा आहे आणि अॅम्प्लिफायर तर वेगळाच आहे, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंनी जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवावं या आव्हानाबाबत बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “तुझी लायकी तरी आहे का ? लोकशाहीने अधिकार दिला म्हणून काहीही बोलायचं. खासदार आहात ना, मग त्याप्रमाणे तुमचं वर्तन असूदेत ना. नंतरचे जे फोटो आलेत त्यातली नासमज अजूनही आहे, असं वाटतंय. अशा शब्दांत पेडणेकर यांनी नवनीत राणांवर सडकून टीका केली. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.