… म्हणून महाराष्ट्र शासनानं कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम’ पुस्तकाला दिलेला पुरस्कार रद्द केला

मुंबई – कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ महाराष्ट्र सरकारनं रद्द केला आहे. याशिवाय  महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांनी गठीत केलेली परिक्षण समिती प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या घडामोडींमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

कोबाड गांधी हे केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी पॉलिट ब्युरो सदस्य होते. जवळपास दशकभर तुरुंगात राहून सुटल्यानंतर कोबाड गांधी यांनी वैयक्तिक आयुष्यातील आणि तुरुंगातील आठवणी, तसंच दरम्यानच्या काळातील घटनांवरचं चिंतन ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकात मांडलं आहे. मूळ इंग्रजीतल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद अनघा लेले यांनी ‘फ्रॅचर्ड फ्रीडम : तुरुंगातील आठवणी व चिंतन’ अस केला आहे.

हे पुस्तक लोकवाङ्मय गृह प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केलंय.माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया साहित्यामध्ये लेखनाचे स्वातंत्र्य असते. परंतु ज्यावर बंदी आहे, ते लिहिता येत नाही. बंदी घालण्याची एक वेगळी प्रक्रिया असते. ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकावर बंदी नसली तरी राज्यात नक्षलवादाचे उदात्तीकरण होऊ शकत नाही. नक्षलवाद मोडून काढणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे .

नक्षलवाद्यांमधील १०० टक्के भरती ही आदिवासी बांधवांमधून होत होती, ती बंद झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शहरी नक्षलवाद जो केला जातो, आपण जसे काही जगावेगळे करत असल्याचे भासवून जे साहित्य लिहिले जाते आणि यात काही लोक सहभागी होतात अशांना समाज क्षमा करु शकत नाही. कुठल्याही परिस्थितीत नक्षलवादाचे उदात्तीकरण हे राज्य शासनाकडून होऊ शकत नाही.

कोण आहेत कोबाड   गांधी? 

सत्तरच्या दशकात सुरू झालेल्या नक्षल चळवळीत शहरातील अनेक तरुण सामील झाले. उच्चशिक्षण घेतलेले मुंबईचे कोबाड  गांधी त्यातले एक. त्यांनी या चळवळीसाठी शहरी भागात बरीच वर्षे काम केले. याच बळावर ते सध्या प्रतिबंधित असलेल्या भाकप (माओवादी) या पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य बनले. त्यांच्या दिवंगत पत्नी अनुराधा गांधी आधी शहरात व शेवटच्या काळात जंगलात सक्रिय होत्या. १७ सप्टेंबर २००९ कोबाड गांधी यांना नक्षली कारवायात सहभागी झाल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. तुरुंगातील वास्तव्यात त्यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’. यात त्यांनी नक्षलींवर बरीच टीका केली आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रसिद्ध होताच चळवळीने त्यांना पक्षातून काढून टाकण्याची घोषणा केली.