पाषाण तलावाची दुरवस्था; ना पालिकेला चिंता ना नेत्यांचे लक्ष

औंध – पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेल्या पाषाण तलावाची ( Pashan Lake) दुरवस्था झाल्याचे समोर आले आहे. खरे तर दरवर्षी केवळ जलपर्णी (Water hyacinth) हटवण्यासाठी निधीचा विनियोग केला जातो परंतु मैलामिश्रीत पाणी सोडले जाऊ नये यासह जलपर्णी वाढू नये यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने दुरवस्था झाल्याचे समोर आले आहे.

रामनदीत (Ram River) थेट सोडलेले सांडपाणी व मैलामिश्रीत पाणी हि पाषाण तलावाची झालेली दुरवस्थेची कारणे आहेत.परंतु याकडे लक्ष न देता केवळ जलपर्णी काढण्यावरच भर दिला जातोय. यामुळे मुळ समस्या कायम राहून खर्च करूनही परिणाम मात्र काहीच दिसून येत नाहीत.सध्या या तलावाच्या पाण्यात मेलेली जनावरे, कचरा, राडारोडा सगळे काही टाकले जाते.याचा परिणाम परिसरात मोठी दुर्गंधी (Stinky) पसरल्याचे चित्र आहे.

२०१७ पुर्वी या ठिकाणी असलेला छानसा जॉगिंग ट्रॅक,गार्डन, पक्षी निरीक्षण केंद्र इत्यादी सोयी सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. परंतु २०१७ नंतर या तलावाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे. तलावाच्या संवर्धनासाठी विशेष उपाययोजना करणे गरजेचे असून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असून पालिकेने लवकरच याबाबत ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी केली आहे.