भास्कर जाधव यांचा आजवरचा इतिहास पाहता त्यानी कोणालाही निष्ठा शिकवू नये – मनसे

खेड – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या बोचऱ्या टीकेला मनसेचे खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.भास्कर जाधव यांना आता मंत्री पदाची आस लागली आहे शिवसेना पक्षनेनेतृत्वाची मर्जी रहावी त्यांना बरे वाटावे म्हणून ते बोलत असावेत असा घणाघात खेडेकर यांनी केला आहे.

ठाकरे कुटुंबावर बोलण्याइतका आपण कोणी मोठे नाही खर तर भास्कर जाधव आपले मित्र आहेत पण  तरीही आपण त्यांना हा सल्ला देत आहोत. असं ते म्हणाले. भास्कर जाधव यांचा आजवरचा इतिहास पाहता त्यानी कोणालाही निष्ठा शिकवू नये. शिवसेना राष्ट्रवादी आणि आता पुन्हा शिवसेना असा यांचा राजकीय प्रवास आहे त्यामुळे कोण धोरणे बदलतेय? कोण निष्ठा बदलतेय? हे अवघ्या रत्नागिरी जिल्हयाला माहिती आहे.

यांनी ज्यावेळी शिवसेना सोडली त्यावेळी याच भास्कर जाधव यांनी चिपळूण खेर्डीच्या त्या चौकात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत ते काय बोलले होते? हे सगळ्या जिल्हयात माहिती आहे.भास्कर जाधव यांच्या राष्ट्रवादीच्या कारकिर्दीत त्यांनी विद्यमान आताचे मंत्री असलेले आदित्य ठाकरे यांच्याबद्दल केलेली वक्तव्य मीडियावर आजही आहेत ती तापसून पहा अशी टीका खेडेकर यांनी केली आहे.