LSG चा मेंटॉर गंभीरची नोकरी धोक्यात, आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर संघ मालकांनी घेतली शाळा?

आयपीएल एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने लखनऊचा ८१ धावांनी पराभव करून त्यांना आयपीएल २०२३ मधून बाहेर काढले. मुंबईविरुद्ध लखनऊने आधीच नमते घेतले होते. संपूर्ण सामन्यात लखनऊचा संघ कुठेही लढताना दिसला नाही. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबईने लखनऊला 183 धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून कृणाल पांड्याचा संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही आणि केवळ १६.३ षटकात १०१ धावा करू शकला.

या मानहानीकारक पराभवामुळे लखनऊ संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर (Gautam Gambhir) निराश झाला. यानंतर लखनऊचे संघ मालक संजीव गोएंकासोबतचा (Sanjiv Goenka) गंभीरचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यानंतर गंभीरला चांगलेच ट्रोल केले जाऊ लागले. व्हायरल फोटोवर, यूजर्स म्हणतात की गंभीरची नोकरी लटकली आहे, त्याला लखनऊमधून कधीही बाहेर काढले जाऊ शकते.

खरं तर मॅचनंतर गोयंका (LSG Owner) गंभीरशी बोलताना दिसले आहेत. यावेळी गोयंका यांचा राग त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. गंभीर त्यांना समजवण्याचा प्रयत्नही करताना दिसला. लखनऊने गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवून प्लेऑफ गाठले होते, जिथे त्यांना साखळी फेरीत चौथ्या स्थानावर राहिलेल्या मुंबईने पराभूत केले. मात्र, या संपूर्ण सीझनमध्ये लखनऊ खूप चर्चेत राहिली. लखनऊचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला असली तरी त्यांच्या खेळावर बरीच टीकाही झाली होती. आता छोट्या छोट्या चुकांमुळे लखनऊने एलिमिनेटर गमावला आहे.