निवडणुकीतील पराभवाची कारणे धंगेकर यांनी आतापासून शोधण्यास सुरुवात सुरुवात केली – माधुरी मिसाळ

Pune – पुण्यातील कसबा (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. या दोन्ही मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी महायुती- मविआ आमने-सामने आहेत या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत.

कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपवर मोठा आरोप केला. भाजपकडून पोलिसांना हाताशी धरून पैसे वाटप केले जात असल्याचा खळबळजनक आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. पुण्यातील पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. त्यापूर्वीच रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. कसबा गणपतीसमोर पत्नीसह ते उपोषणाला बसत आहेत. धंगेकर यांच्यासोबत काँग्रेस नेतेही उपोषणाला बसत आहेत.

दरम्यान, धंगेकर यांच्या या आरोपांचा भाजप (BJP) आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळे पराभूत मानसिकतेतून ते भारतीय जनता पार्टीवर मतदारांना पैसे वाटल्याचा बेछूट आरोप करीत आहेत. हा कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा अपमान आहे. तो मतदार कधीही सहन करणार नाही तसेच निवडणुकीतील पराभवाची कारणे धंगेकर यांनी आतापासून शोधण्यास सुरुवात सुरुवात केली आहे. कसबा मतदारसंघातील मतदार मतपेटी द्वारे चोख उत्तर देतील.

गेले काही दिवस पोलीस प्रशासन कसबा मतदारसंघातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शांततेच्या मार्गाने निवडणुका पार पाडाव्यात यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. मात्र पोलीस आणि प्रशासन यांच्यावरही धंगेकर यांनी आरोप केले आहेत. यामुळे प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. मी धंगेकर यांच्या विधानांचा तीव्र शब्दात निषेध करते असं मिसाळ यांनी म्हटले आहे.