‘महाविकास आघाडी सरकारने संजय राऊत यांना स्वातंत्र्यसैनिक घोषित करून पेन्शन सुरू करावी’ 

मुंबई  – शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने (ED)कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये राऊत यांच्या अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटचा समावेश आहे. एक हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली असल्याचं सांगितलं जातंय.

पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून, श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे. दरम्यान, या कारवाईचे आता राजकीय पडसाद उमटू लागले असून संपूर्ण महाविकास आघाडी आता राऊत यांचा बचाव करताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला विरोधक आक्रमक झाले असून राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान, आता संजय राऊत आज दिल्लीहून मुंबईत येणार म्हणून शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे अशी बातमी आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेला टोला लगावला आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने संजय राऊत यांना स्वातंत्र्यसैनिक घोषित करून पेन्शन सुरू करावी. पद्मभूषण पुरस्कारासाठी त्यांची केंद्राकडे शिफारस करायलाही हरकत नसावी. असं त्यांनी म्हटले आहे.