जानकर लागले निवडणुकीच्या तयारीला; आता बारामती नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लोकसभा लढवणार

नांदेड – बारामती लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेले माजी मंत्री महादेव जानकर हे आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र आता ते बारामती मधून नव्हे तर लोकसभा निवडणूक परभणी जिल्ह्यातून लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. ते नांदेड दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते.

महादेव जानकर नांदेड दौऱ्यावर होते. येथे पक्षाचा मेळावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाचा विस्तार देशभरात केला जाईल. आम्ही निवडणुकादेखील लढवणार आहोत. म्हाडा, परभणी, सांगली अशा जागा आम्ही मोठ्या ताकदीने लढवणार आहोत. मी परभणी मतदारसंघातून लढावं असं मत परभणी येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आहे.

मराठवाडा ही भूमी आमच्यासाठी फर्टाईल लँड आहे. प्रत्येक जिल्ह्यात खातं कसं उघडेल या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरु आहे. संघटना कशी वाढेल यावरही आमचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्र तसेच इतर राज्यातही आमचे दौरे सुरु आहेत. मी स्वत: परभणीमधून स्वत:च्या पक्षाच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. परभणी लोकसभेची निवडणूक लढवू आणि विजयदेखील मिळवू,” असं जानकर यांनी म्हटलंय.