Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना, वर्षाला मिळणार 12 हजार रुपये

मुंबई – केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) सादर केला गेला. राज्य शासनाच्या खजिन्यातून नागरिकांसाठी नेमकी किती आर्थिक तरतूद केली जाणार याकडे लक्ष लागले असताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वाच्या घोषणा यावेळी त्यांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प होता.

यावेळी  मागेल त्याला शेततळे यानंतर मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला हरितगृह, मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र असे घटक उपलब्ध करून दिले जातील तसेच यासाठी १ हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजना – यात अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास २ लाखांपर्यंतचं सानुग्रह अनुदान. आगामी ३ वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणलं जाणार आहे.राज्यातील शेतकऱ्यांना आता एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. उर्वरित रक्कम राज्य सरकारकडून भरण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा 
केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजना या योजनेत आणखी सहा हजार रुपयांची भर केंद्र सरकार घालणार. त्यामुळे शतकऱ्यांना वर्षाकाठी 12 हजार मिळणार-  प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
– नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
– प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
– केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
– 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
– 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार- वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा
– दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकर्‍यांना लाभ
– प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप
– प्रलंबित 86,073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी
– उपसा जलसिंचन योजनेतील शेतकर्‍यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 पर्यंत