राणेंचा शिवसेनेला धोबीपछाड, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव

सिंधुदुर्ग: संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या आणि राणे विरुद्ध शिवसेना व महाविकास आघाडी अशा झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल लागले असून यात  19 पैकी 10 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ पाच जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान,  अजून मतमोजणी सुरू असून इतर जागा कुणाच्या पारड्यात जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, जिल्हा बँकेवर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचं वर्चस्व निर्माण झालं आहे. या विजयानंतर राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे पॅनलचं नेतृत्व करणारे सावंत पराभूत झाले आहेत. दुसरीकडे भाजपचं वर्चस्व असलं तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा पराभव झाला आहे.