‘भाजपच्या खांद्यावर बसून हिंदुत्वाची झेप घेणार्‍या राज ठाकरेंचा भाजपनेच टप्प्यात कार्यक्रम केला’

मुंबई – भाजपच्या खांद्यावर बसून हिंदुत्वाची झेप घेण्याचे स्वप्न पाहणार्‍या राज ठाकरेंना (Raj Thackeray) भाजपच्याच उत्तरप्रदेशातील खासदाराने अयोध्येत (Ayodhya) येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे भाजपनेच (BJP) राज ठाकरेंचा टप्प्यात कार्यक्रम केला असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (NCP Leader Mahesh Tapase) यांनी लगावला आहे. ज्या योगींचे गुणगान राज ठाकरेंनी केले ते मुख्यमंत्री योगी (CM Yogi)  उत्तरप्रदेशच्या जनतेच्या मनाविरुद्ध राज ठाकरेंना भेटतील का ? असा सवालही महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे.

भाजपचे खासदार ब्रिज भूषण सिंग (BJP MP Brij Bhushan Singh) यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यास मज्जाव केला आहे. पहिल्यांदा हिंदी भाषिकांची माफी मागा तरच अयोध्येत या असे फर्मान काढले आहे. त्यामुळे शेवटी कर्माची फळं प्रत्येकाला तिथेच भोगावे लागतात अशी टीकाही महेश तपासे यांनी केली आहे.

राज ठाकरे यांची हिंदुत्वाची पतंग उडण्याअगोदरच भाजपकडून कन्नीकट करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी जे कल्याण रेल्वेस्थानकावर उत्तर भारतीय विद्यार्थ्यांसोबत आणि मुंबईतील टॅक्सी चालकांबाबत केलं त्याची फळे आज त्यांना अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने भोगावी लागत आहेत ही वस्तुस्थिती आहे असेही महेश तपासे म्हणाले.

भाजप युज अँड थ्रो (Use And Throw) या तत्त्वावर चालणारा एक महान पक्ष आहे. आपल्याला उपयोग असेपर्यंत वापर करायचा त्यानंतर केराची टोपली दाखवायची ही भाजपची जुनी रणनीती आहे. आज भोंग्यांच्या (Loudspeaker)  विषयावर विश्व हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) हात झटकल्यानंतर अयोध्याचे खासदार ब्रिज भूषण सिंह यांची घोषणा म्हणजे राज ठाकरेंच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.