पथनाट्यात शंकर-पार्वतीची भूमिका करणाऱ्या व्यक्तींना अटक, काय आहे हे संपूर्ण प्रकरण

नागाव – काली चित्रपटाच्या पोस्टरवरून देशभरात संताप व्यक्त होत असताना, आसाममधील नागावमध्ये भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या रूपात नुक्कड नाटक सादर करण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. आसाममध्ये पथनाट्यात भगवान शिवाची भूमिका करणाऱ्या एका व्यक्तीला धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. नागावच्या सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज राजवंशी यांनी सांगितले की, या प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य दोघांना अटक करणे बाकी आहे.

अटक केलेल्या व्यक्तीने भगवान शिवाच्या वेषात पथनाट्याद्वारे इंधनाच्या वाढत्या किमतींचा निषेध केला होता. विहिंप आणि बजरंग दलाच्या तक्रारीच्या आधारे, नागाव पोलिसांनी शनिवारी कार्यकर्ता बिरिंची बोरा याला जामीनपात्र कलमांखाली अटक केली. मात्र, नंतर आरोपींना जामीन मिळाला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

इंधन, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंच्या वाढत्या किमतींचा निषेध करण्यासाठी शनिवारी संध्याकाळी शिव आणि पार्वतीची वेशभूषा केलेले स्त्री-पुरुष रस्त्यावर उतरले तेव्हा वादाला सुरुवात झाली. दोन्ही दुचाकीस्वार नागाव येथील कॉलेज चौकात पोहोचले आणि वाहनातील इंधन संपल्याने त्यांनी नाटक केले. बिरांची बोरा नावाच्या व्यक्तीने भगवान शिवाच्या वेषात लोकांना वाढत्या महागाईपासून मुक्त होण्यासाठी मोदी सरकारच्या विरोधात उतरण्यास सांगितले.

यावेळी पार्वतीची वेशभूषा करून एक महिला कलाकारही नाटकात सहभागी झाली होती. नाटकात दोघेही एका रस्त्यावर बाईक चालवत होते. बाइकचे पेट्रोल संपल्याने दोघेही नाटकासाठी ठरलेल्या ठिकाणी थांबतात. यानंतर दोन्ही कलाकार आपापसात वाद घालतात. त्यानंतर भगवान शंकराचे रूप घेतलेल्या व्यक्तीने महागाईबाबत मोदी सरकारवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली. याप्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बिरांची बोराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. मात्र, नंतर त्यांना जामीन मिळाला.