मंत्रीपदाची शपथ घेतलेले मंगलप्रभात लोढा सगळ्यात श्रीमंत तर ‘या’ मंत्र्याची आहे संपत्ती सगळ्यात कमी!

Mumbai – जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला. आज 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.

भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा या क्रमाने 18 आमदार शपथबद्ध झाले.

दरम्यान, शपथ घेतलेले सर्वच मंत्री हे कोट्यधीश आहेत. यातील सर्वाधिक जास्त संपत्ती ही मलबार हिलचे भाजपाचे आमदार आणि नव्यानेच मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या नावावर आहेत. व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक म्हमजेच बिल्डर असलेल्या मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे. निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे 441 कोटी रुपयांची चल आणि अचल संपत्ती आहे.

६ वेळा आमदारकी भूषवलेल्या मंगलप्रभात लोढा यांच्याकडे 252 कोटी रुपयांची चल तर 189 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यांच्याकडे 14 लाख रुपयांचा जग्वार कार असून शेअर बाजार आणि बॉण्डमध्ये त्यांनी गपंतवणूक केलेली आहे. दक्षिण मुंबईत लोढा यांचे पाच फ्लॅट आहेत. लोढा यांच्याविरोधातही पाच गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, 2 कोटी संपत्ती असलेले संदीपान भुमरे हे या मंत्रिमंडळआतील सर्वात गरीब मंत्री आहेत. संदीपान भुमरे हे पैठणचे आमदार असून, गेल्या 35 वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत.