मराठा आरक्षण : वडीकाळ्यात हजारोंच्या संख्येत आरक्षण रॅली

सुखापुरी: मागील काही दिवसांपासून अंबड तालुक्यातील वडीकाळ्या गावात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणाची तयारी जोरात सुरू आहे. वडीकाळ्या ग्रामस्थांनी दिलेल्या मागण्यांच्या निवेदनाला उत्तर म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडीकाळ्या ग्रामस्थांना मुंबई येथे चर्चेसाठी २७ जानेवारी रोजी बोलावले होते त्याप्रमाणे वडीकाळ्या ग्रामस्थ चर्चेसाठी गेले देखील मात्र चर्चेत मागण्यांवर तोडगा निघू न शकल्याने ग्रामस्थ येत्या ५ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणावर ठाम असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्याच पार्श्वभूमीवर वडीकाळ्या येथे ग्रामस्थांच्या वतीने विराट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

वडीकाळ्या ग्रामस्थांच्या वतीने आयोजित महा रॅलीत हजारोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते तर शेकडो बैलगाड्या, लहान मोठे सर्व ट्रॅक्टर , गावातील सर्व चारचाकी व दुचाकी वाहनांचा समावेश होता. रॅलीतील महिलांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी महिला व मुलींनी आम्हाला आरक्षण द्या आमची मुले आम्ही एक एका मार्कवरून कुठल्याही परीक्षेत केवळ आणि केवळ आरक्षण नसल्याने मागे पडतो आहोत. आम्ही पात्र असूनही आम्हाला नेहमी अपत्रतेचा सामना आरक्षण नसल्याने करावा लागतो, मायबाप सारकारने आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे मत व्यक्त केले

चार तारखेपर्यंत आमच्या मागण्यांवर सरकारने तोडगा काढावा नाहीतर आम्ही आमच्या आमरण उपोषणवर ठाम आहोतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर कॅबिनेट लावून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा आम्ही मेलो तरी देखील उपोषण मागे घेणार नाही, आमच्या जीवित्वाला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल
– मनोज जरांगे – मराठा आंदोलक