महाविकास आघाडीला तडा : स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर

कोल्हापूर : माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी ( Raju Shetty )आता महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीत ही घोषणा केली. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.

निवडणूक लढवता यावी म्हणून आपण चळवळ उभा केली नाही. तर चळवळ टिकवी म्हणून आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला असं राजू शेट्टी म्हणाले. सध्या भाजप ( BJP ) सोबत जाण्याचा विचार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेला नाही असंही ते म्हणाले.

दरम्यान, दोन आठवड्यापूर्वी म्हणजे 24 मार्च रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार ( MLA Devendra Bhuyar ) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तशी घोषणा राजू शेट्टी यांनी अमरावतीमधून केली होती. देवेंद्र भुयारबद्दल अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. तुम्ही शेतकऱ्यांचा घात केला असेल तर अशी घाण आमच्या संघटनेत राहू शकत नाही, असा घणाघात शेट्टी यांनी केला. आजपासून देवेंद्र भुयारचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध नाही. त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी घोषणा शेट्टी यांनी केली. इतकंच नाही तर राजू शेट्टी यांनी भुयार यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात हल्ला चढवला होता.