आमदार सुहास कांदे यांची उच्च न्यायालयात धाव; मत रद्द करण्याच्या निर्णयाला दिले आव्हान

मुंबई : गेल्या आठवड्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीतील (Rajya Sabha elections) केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाला शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Shiv Sena MLA Suhas Kande) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) आव्हान दिले आहे. या निवडणुकीत निवडणूक आयोगाने आमदार कांदे यांचे मत अवैध ठरवले होते. कांदे यांनी निवडणूक प्रक्रियेत उल्लंघन केल्याचा आरोप भाजपने (BJP) केला होता. त्यानंतर आयोगाने हे पाऊल उचलले. आता कांदे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत आपण काहीही चुकीचे केले नसल्याचा दावा केला आहे.

सुहास कांदे यांनी अधिवक्ता अजिंक्य उडाणे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत निवडणूक आयोगाने आपले मत अवैध ठरविण्याच्या निर्णयामुळे आपल्या प्रतिष्ठेला  मोठा धक्का बसल्याचे म्हटले आहे. आयोगाचा निर्णय बाजूला ठेवण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. कांदे यांच्या याचिकेचा संदर्भ वकिलाने न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती धीरज सिंह ठाकूर यांनी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली.