पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान नाही; मनसेचा इशारा

प्रेमासाठी भारतात आलेली पाकिस्तानी हसिना सीमा हैदर (Seema Haider) हिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. निर्माते अमित जानी (Amit Jani) यांनी सीमा हैदरला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. आपण तिच्या प्रेमकथेवर सिनेमा बनवणार असून त्यात सीमा हैदर मुख्य भूमिकेत असेल अशी घोषणा त्यांनी केली आहे. दरम्यान, यावरून महाराष्ट्र नवनिर्मान चित्रपट सेनेने त्यांना इशारा दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!