‘मी या तारखेला मुंबईत येणार, मला रोखून दाखवा’; चित्रपट निर्माते अमित जानींचे मनसेला आवाहन

प्रेमासाठी भारतात आलेली पाकिस्तानी हसिना सीमा हैदर (Seema Haider) हिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. निर्माते अमित जानी (Amit Jani) यांनी सीमा हैदरला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. आपण तिच्या प्रेमकथेवर ‘कराची टू नोएडा’ सिनेमा बनवणार असून त्यात सीमा हैदर मुख्य भूमिकेत असेल अशी घोषणा त्यांनी केली आहे. दरम्यान, यावरून महाराष्ट्र नवनिर्मान चित्रपट सेनेने त्यांना इशारा दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!

आता अमित जानी यांनी मनसेवर पलटवार केलाय. चित्रपट निर्मात्यांना धमकावणं, त्यांच्याकडून वसुली करणं हे मनसेच काम आहे. मी मनसेच्या हल्ल्याच्या धमकीला अजिबात घाबरत नाही. अमित जानी 19 तारखेला मुंबईत येणार. तुम्ही अमित जानीला रोखू शकत नाही, असं विधान अमित जानी यांनी मनसेला आवाहन दिलं आहे.

अमित जानी उत्तर प्रदेशच्या मेरठचे निवासी आहेत. उत्तर प्रदेश-बिहारचे प्रोड्युसर, अभिनेते आणि प्रोडक्शन हाऊस चित्रपटाची निर्मिती करत आहे. त्यामुळे राज ठाकरेची पार्टी चिडली आहे. मुंबईला बसलेल्या लोकांच्या हाताला हा चित्रपट लागला नाही. म्हणून ते नाराज आहेत, असं अमित जानी म्हणाले.