‘हर हर महादेव’ चित्रपटावरून मनसे-राष्ट्रवादी आमनेसामने! अविनाश जाधव दाखवणार मोफत शो

Har Har Mahadev Controversy: ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आक्रमक भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि कार्यकर्त्यांनी काल ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा चालू शो बंद पाडला. मात्र आव्हाड यांनी पाठ फिरवताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी शो पुन्हा चालू केला. यानंतर आता त्यांनी हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार असल्याची घोषणाही केली आहे. यामुळे आता राजकारण आणखीनच तापण्याची शक्यता आहे.

मनसेने पुन्हा सुरू केला शो
अभिजित देशपांडे (Abhijit Deshpande) दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला गेला आहे. या चित्रपटात शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला आहे, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. याच कारणावरून काल ठाणे येथील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. ‘हर हर महादे’व चित्रपटाचे स्क्रिनिंग होत असलेल्या या चित्रपटगृहात आव्हाड त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोहोचले आणि त्यांनी चित्रपटाचे स्क्रिनिंग थांबवले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहातील सर्व लोकांना बाहेर काढले. उपस्थित प्रेक्षकांपैकी काहींनी त्यांना विरोधही दर्शवला. यादरम्यान विरोध दर्शवणाऱ्या एका प्रेक्षकाला कार्यकर्त्यांनी मारहाण देखील केल्याची दृश्ये पुढे आली आहेत. राष्ट्रवादीने हर हर महादेव चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये राडा घातल्यानंतर मनसे नेते (MNS) अविनाश जाधव यांनी ५ मिनिटात विवियाना मॉल गाठून चित्रपट पुन्हा सुरू करण्यास सांगितले. यानंतर अविनाश यांनी स्वत: चित्रपटगृहात बसून संपूर्ण चित्रपट पाहिला.

मनसेकडून दाखवण्यात येणार मोफत शो
यानंतर आज अविनाश जाधव यांनी मनसेकडून हर हर महादेव चित्रपटाचा मोफत शो दाखवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्टर शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. ‘मंगळवार, दिनांक ८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.१५ वाजता ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेवचा मोफत शो दाखवण्यात येणार आहे. याचे आयोजक मनसे आहे’, अशी माहिती त्यांनी या पोस्टरद्वारे दिली आहे.