लातूर वाहतूक पोलिसांकडून प्रतिष्ठित डॉक्टरांना धक्काबुक्कीचे प्रकरण दुर्दैवी – देशमुख

लातूर (प्रतिनधी) : लातूर शहरात सोमवारी सायंकाळी शहर वाहतूक पोलिसांकडून एका प्रतिष्ठित डॉक्टरांना झालेली धक्काबुक्कीची घटना दुर्दैवी असून, हे प्रकरण आता माफीनामा घेऊन आणि माफी देऊन मिटले असले तरी शहरात आणि जिल्ह्यात पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी पोलीस विभागाला दिले आहेत.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की सोमवारी सायंकाळी शिवाजी चौक परिसरात आपल्या चार चाकी गाडी समोर एक महिला आल्यामुळे डॉ. आनंद गोरे यांनी आपले वाहन थांबवले असता वाहतूक पोलिसांकडून त्यांना अचानक वाहन थांबवण्याबाबत जबाब विचारण्यात आला. डॉ गोरे यांचे म्हणणे ऐकून न घेतातच पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यांना पोलिस ठाण्यात नेऊन त्यांच्यावरच गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न झाला, यावेळी डॉ गोरे यांच्या मित्रमंडळीनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित देशमुख यांना सदरील घटनेची माहिती दूरध्वनीवरून कळवली. पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दूरध्वनी करून या प्रकरणात तातडीने लक्ष निर्देश दिले, डॉ गोरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क करून धीर दिला. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी ताबडतोब शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे येऊन प्रकरण समजून घेतले डॉ गोरे यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.

लातूर आयएमए च्या वतीने आज जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदवला, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली, दरम्यान घडल्या प्रकाराबद्दल पोलीस कर्मचाऱ्याने दिलगिरी व्यक्त करून माफी मागितल्यानंतर हे प्रकरण मिटले आहे. या सर्व प्रकारांची इतंभूत माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांनी वेळोवेळी घेतली आहे.

हे प्रकरण सामोपचाराने मिटले असले, एकूण हे प्रकरण दुर्दैवी धक्कादायक आणि खेदजनक आहे, लातूरच्या पोलिसांची आजवरची कामगिरी पाहिली असता असा प्रकार यापूर्वी कधीही घडलेला नाही. त्यामुळे काल जे घडले ते धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे, याची सखोल चौकशी होऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ना देशमुख यांच्याकडून पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत, हे प्रकरण सामोपचाराने मिटले असले तरी, ते नेमके का आणि कसे घडले याची चौकशी होणे आवश्यकच आहे असे नमूद करून संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी यांनी आपल्या अधिकाराचा बाहेर जाऊन वर्तन केले असेल तर त्या बाबतीत त्यांना समाज आणि शासन होणे क्रमप्राप्त आहे पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे. याबाबतीत जिल्हा पोलीस अधीक्षक गांभीर्याने कार्यवाही करतील अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शिवाय लातूरच्या परंपरेत न बसणारा असा प्रकार भविष्यात घडणार नाही याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी जनतेशी सौजन्याने वागावे असे निर्देश पालकमंत्री  देशमुख यांनी पोलीस व प्रशासनालाही दिले आहेत.