राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? भाजपचे नेते शेट्टींच्या भेटीला

कोल्हापूर – महाविकास आघाडी सरकारला लवकरच मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेतकरी विरोधी अनेक निर्णय घेतले जात असल्याचा आरोप होत असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची शक्यता दिसू लागली आहे.

या सरकारला अडीच वर्ष होत आली आहेत. महाविकास आघाडी सरकारचं समीक्षण करण्याची आता वेळ आली आहे. ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर ही महाविकास आघाडी अस्तित्वात आली, त्या किमान समान कार्यक्रमाचं काय झालं?” असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

आमच्या पाठिंबा देण्यामुळे किंवा न देण्यामुळे सरकारच्या स्थैर्यावर काही परिणाम होणार नाही हे त्यांनाही माहिती आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमध्ये राहिली काय किंवा नाही काय? सरकारला काही फरक पडत नाही असा खोचक टोला राजू शेट्टी यांनी लगावला.

दरम्यान, महाविकास आघाडीमधून शेट्टी बाहेर पडण्याची शक्यता निर्माण होताच आता भाजपा त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. सकाळी शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर टीका करताच दुपारी भाजपनेते त्यांच्या भेटीला गेले. यावेळी बंद खोलीत सुमारे अर्धा तास कोल्हापूर उत्तर पाठींब्यासह महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजपला पाठींबा देण्यासह विविध विषयावर चर्चा झाली असं सांगण्यात येत आहे.

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जयसिंगपूर येथे राजू शेट्टी यांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आदी प्रमुख उपस्थित होते. त्यामुळे आगामी काळात शेट्टी हे पुन्हा भाजपासोबत जाणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.