माता काली ही माझ्यासाठी मांस व मद्य ग्रहण करणारी देवी आहे – महुआ मोईत्रा

नवी दिल्ली : माँ कालीच्या (Ma Kaali Movie Poster) वादग्रस्त पोस्टर प्रकरणी दिल्ली आणि यूपीमध्ये एफआयआर (FIR)दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने माँ काली पोस्टर प्रकरणी कलम 153A आणि 295A अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. दिल्ली पोलिसांना काली माँच्या पोस्टर वादाच्या दोन तक्रारी आल्या होत्या. एक तक्रार नवी दिल्ली आणि एक तक्रार IFSO ला देण्यात आली होती. IFSO युनिटने हे चित्र पोस्ट करणाऱ्या लीना मनिमेकलाई (Leena Manimekali) यांच्या विरोधात IPC 153A  आणि IPC 295A (कोणत्याही वर्गाच्या, धर्माच्या भावना भडकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, एका बाजूला या सर्व घडामोडी घडत असताना आता ‘माता काली ही माझ्यासाठी मांस व मद्य ग्रहण करणारी देवी आहे,’ असे विधान करून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवरून सुरू झालेल्या वादात उडी घेतली आहे. चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवर कालीमाता सिगारेट ओढताना दाखविली आहे. यामुळे देशभरात संताप व्यक्त होत असतानाच महुआ मोईत्रा यांनी ‘काली मातेला मी मांस व मद्य ग्रहण करणाऱ्या देवीच्या रूपात पाहते,’ असे सांगत मणिमेकलाई यांची बाजू घेतली.

‘आपापल्या पद्धतीने देवतेचे चित्र रंगविण्याचा आणि तिचे पूजन करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. देवदेवतांना व्हिस्कीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथाही काही ठिकाणी आहे. हे ईश्‍वरनिंदा ठरू शकते,’असेही त्या म्हणाल्या. एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात त्या बोलताना मोईत्रा म्हणाल्या, की तुम्ही सिक्कीमला गेलात तर तेथे काली मातेला व्हिस्की देण्याची प्रथा असल्याचे दिसेल तर उत्तर प्रदेशात गेला आणि सांगितले की तुम्ही काली मातेला प्रसादात व्हिस्की ठेवल्याचे सांगितले तर तेथे याला ईश्‍वराची निंदा केली असे म्हटले जाईल.