उद्योग नगरीची सांस्कृतिक नगरीकडे वाटचाल – उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar : ‘नाटक हे मराठी माणसाचं पहिलं प्रेम आहे. त्यामुळे नाट्य चळवळ आजही जिवंत आहे.’ मराठी नाटकांना विष्णुदास भावे यांच्यापासून पावणे दोनशे वर्षांची परंपरा असल्याचं सांगितलं जात असली तरी; मराठी नाटकांची पाळंमुळं स्वराज्य संकल्पक शाहाजीराजे भोसले यांच्या काळात तंजावर येथील ‘लक्ष्मी नारायण मंगलम्’ या नाट्य कलाकृती पासूनची म्हणजे चारशे वर्ष जुनी आहेत. पिंपरी -चिंचवड हे शहर उद्योग नगरी म्हणून ओळखले जाते. पण आता उद्योग नगरीची वाटचाल ही सांस्कृतिक नगरीकडे होतीये, अशा भावना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने ६ आणि ७ जानेवारी २०२४ रोजी पिंपरी चिंचवड मध्ये ऐतिहासिक शंभरावे नाट्यसंमेलन होणार आहे. या नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज (दि.२५) हॉटेल ग्रँड एक्झाँटीका, आकुर्डी येथे करण्यात आले. यावेळी अजित पवार बोलत होते. या प्रसंगी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, डॉ. पी. डी. पाटील, कृष्णकुमार गोयल, नाना काटे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, कविता अल्हाट, राजेशकुमार साकला, सचिन इटकर, शत्रुघ्न काटे, योगेश बहल, अजित गव्हाणे, गणेश घुले, राहुल भोसले, पुणे जिल्ह्यातील नाट्यपरिषदेचे पदाधिकारी, सुरेश धोत्रे, दिपालीताई शेळके, मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले व पिंपरी चिंचवड शाखेचे, किरण येवलेकर, सुहास जोशी, राजेंद्र बंग, मनोज डाळिंबकर, प्रणव जोशी, आकाश थिटे, संतोष रासने, सुदाम परब, संतोष पाटील, कविता अल्हाट आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, जेव्हा आपण विकास झाला आहे असे म्हणतो, तेव्हा तो सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. यामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक विकास देखील अंतर्भूत आहे. पुण्याची ओळख ही विद्येचे माहेरघर म्हणून आहे. तर पिंपरी -चिंचवड हे शहर उद्योग नगरी म्हणून ओळखली जाते. पण आता उद्योग नगरीची वाटचाल ही सांस्कृतिक नगरीकडे होतीये. यापूर्वी देखील या उद्योग नगरीने नाट्यसंमेलन आणि साहित्य संमेलन उत्साहात पार पाडले आहे. त्यामुळे यंदाचे १०० वे नाट्य संमेलन देखील तितक्याच उत्साहात आयोजित केले जाईल याची मला खात्री आहे.

पूर्वीच्या काळी तमाशा आणि नाटक हे दोनच कलाप्रकार मनोरंजनाची साधनं होती. ग्रामीण भागात तमाशा आणि शहरी भागात नाटकं अधिक लोकप्रिय झाली. नाटकांनी केवळ मनोरंजनच केले नाही. तर अनेक राजकीय, सामाजिक, कौटुंबिक प्रश्नांना हात घालून त्यांच्यावर भाष्य देखील केलं. कोरोंना काळात नाटकं बंद झाली होती. अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. पण आमचे सरकार त्यांच्या मागे उभे राहिले, असे ही अजित पवार यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, यंदा संमेलनासाठी १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामधून नाट्य परीषदेच्या राज्यभरातील विविध शाखांना वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करता येतील. तसेच जो निधी राखून ठेवला आहे. त्यांच्यावरील व्याजातून देखील चांगल्या पद्धतीने काम करता येईल.  यंदाच्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आहेत, त्यांच्यामुळे हे संमेलन अधिक ऊंचीवर जाईल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक करताना नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले,१०० वे संमेलन घेण्याची संधी आम्हाला मिळाली हा योगायोग नाही तर १९९६ पासूनची २७ वर्षांची आमची मेहनत आहे. कारण १९९९ साली पिंपरी मध्ये ७९ वे नाट्य संमेलन घेतले होते. आज ही संमेलन घेणारी तीच टीम आहे. अन् पुन्हा एकदा अजित पवार हे या संमेलनाचे नेतृत्व करीत आहे. संमेलन हा केवळ एका व्यक्तीचा नावलौकीक नसतो तर तो त्या शहराचा नावलौकीक असतो. या संमेलनाला आपण सगळ्यांनी हातभार लावावा, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आकाश थिटे व उन्नती कांबळे यांनी केले.

महत्वाच्या बातम्या-

मोदी सरकार भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही, मुजोर बजरंग पुनियाचा तीव्र निषेध : अतुल भातखळकर

दु:खद! प्रसिद्ध कॉमेडियनने घेतला जगाचा निरोप, दोन्ही किडन्या फेल झाल्यामुळे गेला जीव

हार्दिक पांड्याच्या संघात पुनरागमनाचा सस्पेन्स संपला! ‘या’ मालिकेतून कमबॅक करणार