सीएसकेत धोनीची जागा घेणार बेन स्टोक्स? सीईओ काशी विश्वनाथन यांनी कॅप्टन्सीवर सोडले मौन

आयपीएल २०२३च्या मिनी लिलावात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके, CSK) संघाने इंग्लंडचा धाकड अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याला विकत घेतले आहे. स्टोक्सला लिलावात विकत घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, लखनऊ सुपरजायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर सीएसकेने १६.२५ कोटींच्या किंमतीत त्याला विकत घेतले आहे. यानंतर एमएस धोनीचा (MS Dhoni) उत्तराधिकारी म्हणून स्टोक्सकडे पाहिले जात आहे. आता यावर सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन (CSK CEO Kashi Vishwnathan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

४१ वर्षीय धोनीचा हा कदाचित शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. अशात धोनीनंतर २०२४ मध्ये सीएसकेची धुरा सांभाळण्यासाठी एका अनुभवी खेळाडूची गरज भासेल. स्टोक्स ही कमी भरून काढू शकतो. कारण त्याच्याकडे इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व करण्याचा अनुभव आहे. स्टोक्सला सीएसकेचा भावी कर्णधार करण्याच्या निर्णयावर काशी विश्वनाथन म्हणाले की, स्वत: धोनीच याबाबत निर्णय घेईल.

ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना विश्वनाथन म्हणाले की, “स्टोक्सला आमच्या ताफ्यात सहभागी करून आम्ही खूप खुश आहोत. आम्ही खूप नशीबवान होतो की, शेवटी स्टोक्स आमच्याच संघात आला. आम्हाला एका अष्टपैलूची गरज होती आणि धोनीही स्टोक्स आम्हाला मिळाल्याने खूप आनंदी होता. यासह आमच्याकडे कर्णधारपदासाठी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. परंतु धोनी वेळेनुसार योग्य तो निर्णय घेईल.” 

सीईओ विश्वनाथन यांच्या वक्तव्यानंतर आता पुढील काळात धोनी स्टोक्सबद्दल काय निर्णय घेतो?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील.