विश्वचषक संघात मुंबई इंडियन्सचे वर्चस्व, 3 फ्रँचायझींच्या एकाही खेळाडूला स्थान मिळाले नाही

India World Cup Squad: आगामी ICC विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी 15 जणांचा भारतीय संघ भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल जाहीर केला. अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीनं भारतीय संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची, तर उपकर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची निवड केली आहे.

दुखापतीमुळे दीर्घ काळ विश्रांती घेऊन परत आलेल्या के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचाही संघामध्ये समावेश केला आहे. विराट कोहली, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांचा मुख्य संघात समावेश केला आहे. संजू सॅमसन, टिळक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना मात्र संघातून वगळण्यात आलं आहे. 2011मध्ये भारतात विश्वचषक क्रिकेट स्पर्धा झाली होती, त्यावेळी एम. एस. धोनी याच्या नेतृत्वाखाली भारतानं विश्वचषक जिंकला होता.

जर आपण भारतीय संघाच्या 15 सदस्यीय विश्वचषक संघावर नजर टाकली तर त्यात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझी मुंबई इंडियन्सची ताकद दिसून आली. रोहित शर्मा भारत आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचे नेतृत्व करत आहे. त्यांच्यासह एकूण 4 खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. यात रोहितशिवाय इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावाचा समावेश आहे.

आयपीएलच्या इतर संघांमधून निवडलेल्या खेळाडूंमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यर, दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादव आणि अक्षर पटेल, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून विराट कोहली आणि मोहम्मद सिराज, तर गुजरात टायटन्सकडून हार्दिक पंड्या, शुभमन गिल आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.

आयपीएलच्या 16व्या हंगामाचे विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जच्या विश्वचषक संघात केवळ 1 खेळाडूला स्थान मिळाले आहे, तो म्हणजे रवींद्र जडेजा. याशिवाय लखनऊ सुपरजायंट्स संघातील लोकेश राहुल विश्वचषक संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. याशिवाय सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जच्या संघातील एकाही खेळाडूला भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक संघात स्थान मिळालेले नाही.

महत्त्वाच्या बातम्याः

हे तर एखाद्या शेंबड्या पोरालाही पटणार नाही; जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
देशात शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं मोठं संकट, चुकीच्या लोकांकडे देशाचे नेतृत्व गेलेले आहे- शरद पवार
देश व लोकशाही वाचवण्याची लढाई केवळ काँग्रेसची नाही तर आपल्या सर्वांची: नाना पटोले
राज्यातील येड्याच्या सरकारने वीज महाग केली आहे, शेतीला आठ तासही विज मिळत नाही – Nana Patole