जातीय सलोख्याचे अनोखे उदाहरण;  मुस्लिम कुटुंबाच्या हस्ते हिंदू कर्मचाऱ्याचे केले अंत्यसंस्कार

पाटणा : जातीय सलोख्याचे (ethnic harmony) उदाहरण देत बिहारमधील एका मुस्लिम कुटुंबाने हिंदू पुरुषाचे अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी मोहम्मद रिजवान खानचा (Mohammad Rizwan Khan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिझवान येथे काम करणाऱ्या रामदेव साह यांचे पार्थिव घेऊन जाताना दिसत आहे.

रामदेव साह (Ramdev Sah) पाटणा (Patna) येथे रिझवानच्या कपड्यांच्या दुकानात काम करायचे. त्यांनी 25 वर्षे दुकानात काम केले. मोहम्मद रिझवान त्याच्याशी कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागत होते. रामदेव साह यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. रिझवान आणि त्याच्या कुटुंबीयांनी हिंदू रितीरिवाजांनुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्काराच्या वेळी अनेक मुस्लिम शेजारीही उपस्थित होते.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रामदेव साह दोन दशकांपूर्वी नोकरीच्या शोधात रिजवान खानच्या दुकानात आले होते.  रिझवान खान त्याच्या साधेपणाने प्रभावित झाले होते.ते सांगतात, ते माझ्या वडिलांसारखे होते. जेव्हा ते माझ्या दुकानात नोकरीच्या शोधात आले तेव्हा त्यांचे वय ५० च्या आसपास असावे. मी त्यांना म्हणालो की तुम्हाला भारी काम करता येणार नाही. तेव्हा त्यांनी सांगितले  की ते अकाउंटंट (Accountant) आहेत आणि  तुमचे व्यवहार मी पाहीन.

पुढे बोलताना रिजवान म्हणाले,  रामदेव साह हे त्यांच्या कुटुंबासाठी पालकासारखे होते.साह यांचे वय वाढल्याने त्यांना त्यांचे कर्तव्य बजावता आले नाही. मी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले. मी त्यांना सांगितले की त्यांचा पगार मिळेल आणि त्यांना कशाचीही चिंता करण्याची गरज नाही.

सध्या सुरू असलेल्या जातीय संघर्षांवर देखील त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, टेलिव्हिजनवर जे दाखवले जात आहे ते योग्य चित्र नाही. एखादे मूल जखमी झाले की आम्ही त्याचा धर्म विचारत नाही, आम्ही प्राथमिक उपचार देतो. त्याचप्रमाणे हिंदू आमच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात आणि आम्ही त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होतो.