‘आई मला कडेवर घेऊन लोकांना सांगायची, मुंडे साहेबांचं चिन्ह कमळ अन् ही आमची मुलगी पंकजा…’

बीड : माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीला उजाळा म्हणून बीड मध्ये वरद ग्रुपच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे नगर उभे केले आहे. आज याचे लोकार्पण सोहळा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी खा. प्रीतम मुंडे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. गोपीनाथ मुंडे नावाचे हे राज्यातले पहिलेच नगर आहे. या नगराच्या लोकार्पण सोहळ्यात पंकजा मुंडे यांनी आपला आणि भाजपचा संबंध कसा जवळचा आहे याचा किस्सा सांगितलं आहे.

लहानपणी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचार सभेच्या वेळची आठवण सांगताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेबांच्या प्रचारसभेत मी आईच्या कडेवर असायचे. सभेसाठी जमलेल्या लोकांना आई सांगायची, मुंडे साहेब यांचं चिन्ह कमळ आहे आणि ही आमची मुलगी पंकजा. तेंव्हापासून मी भाजपचा प्रचार करायचे असा किस्सा पंकजा मुंडे यांनी आज या कार्यक्रमात सांगितला.

दरम्यान, गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञा मुंडे यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे यांचा जन्म 26 जुलै 1979 रोजी परळीत झाला. पंकजा यांच्या नावाच्या बाबतीत एक किस्सा परळीत सांगितला जातो, तो म्हणजे, पंकजा यांचे नाव त्यांचे मामा म्हणजेच प्रमोद महाजन यांनी ठरवले होते. मुलगा झाला तर पंकज आणि कन्या झाली तर पंकजा. त्याचे कारणही विशेष असेच होते. त्याच सुमारास भारतीय जनता पक्षाला कमळ हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. कमळाचा समानार्थी शब्द पंकज असा होतो. त्यावरून मुंडे साहेबांना कन्या झाल्यावर त्यांचे नाव पंकजा असे ठेवण्यात आले.