PFI च्या हिटलिस्टमध्ये RSS च्या 5 नेत्यांची नावे, गृह मंत्रालयाने दिली नेत्यांना ‘Y’ श्रेणी सुरक्षा 

नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि IB च्या अहवालाच्या आधारे केंद्रीय गृह मंत्रालयाने केरळमधील 5 RSS नेत्यांना ‘Y’ श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे.  केंद्रीय गुप्तचर संस्थांना असे इनपुट मिळाले आहेत, ज्यामध्ये बंदी घातलेल्या कट्टरपंथी संघटनेच्या हिटलिस्टमध्ये केरळमधील (Kerala) पाच नेते आहेत. संभाव्य धोका ओळखून गृह मंत्रालयाने या नेत्यांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा देण्याची घोषणा केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NIA ला छापेमारीत केरळ PFI सदस्य मोहम्मद बशीर यांच्या घरातून एक यादी सापडली, ज्यामध्ये PFI च्या रडारवर RSS च्या पाच नेत्यांची नावे होती. यानंतर एनआयए आणि आयबीच्या अहवालाच्या आधारे केंद्रीय गृहमंत्रालयाने केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 5 नेत्यांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. आता त्यांच्या सुरक्षेत निमलष्करी दलाचे कमांडो तैनात करण्यात येणार आहेत. यलो बुक ऑफ सिक्युरिटीनुसार, गृह मंत्रालयाच्या Y श्रेणीच्या सुरक्षेसाठी नियमानुसार 8 सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये ज्या व्हीआयपींना सुरक्षा पुरवली जाते, त्यांच्या घरी ५ सशस्त्र स्टॅटिक गार्ड तैनात असतात. तसेच तीन शिफ्टमध्ये तीन PSO संरक्षण देतात.

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणेने तसा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला होता. 22 सप्टेंबर रोजी पीएफआय सदस्य मोहम्मद बशीर यांच्यावर छापेमारी करताना एनआयएला आरएसएस (RSS) नेत्यांची यादी मिळाली. यामध्ये संघाच्या ५ नेत्यांची हत्या केल्याचा उल्लेख होता. यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने या पाच नेत्यांना वाय श्रेणीची सुरक्षा दिली आहे.