काहींना दिवसाही सत्तेची स्वप्न पडतात; नाना पटोलेंनी धनंजय मुंडेंची उडवली खिल्ली

नागपुर – गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीतील नेते विविध दावे करत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे (Supriya Sule) उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे (Tuljabhavani Devi) दर्शन घेतले. या दर्शनानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार’ असं साकडं घातलं.

यानंतर शिवसेनेकडून देखील राष्ट्रवादीला अनेक टोमणे मारण्यात आल्याचं दिसून आलं. यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य करणे सुरु झाले आहे. येणाऱ्या काळाता राज्यात मुख्यमंत्री (CM) हा आपलाच असेल असं वक्तव्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी साताऱ्यातील डिस्कळ येथील एका सभेत व्यक्त केलं आहे.

दरम्यान, या वक्तव्याचा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल असे म्हटले असेल तर त्यात काही गैर नाही. प्रत्येक पक्षाने तशी अपेक्षा ठेवली पाहिजे. लोकशाहीत पक्ष वाढविण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. मात्र काहींना दिवसाही स्वप्न पडतात, अशा शब्दात नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना टोला लगावला. नाना पटोले शनिवारी नागपुरात बोलत होते.