द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपाला पाठिंबा नाही – संजय राऊत

मुंबई : राज्यातील राजकीय नाट्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शिंदे गटातील आमदार आणि शिवसेना यांच्यातील शाब्दिक चकमक दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे (Presidential election ) राष्ट्रपती निवडणुकींची खलबते ही देशाच्या राजधानीत घडत आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुशंगाने शिवसेना खासदारांची आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत एनडीए च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय झाला आहे असं समजतंय.

हा पाठिंबा कुण्या पक्षाला नाहीतर राष्ट्रपतीपदी असलेल्या उमेदवाराला असल्याचे खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय आपण सर्व बाबींकडे तटस्थपणे पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पक्ष कोणताही असो उमेदवाराला पाहून हा निर्णय झाल्याचेही ते म्हणाले. शिवाय शिवसेनेत कुणालाही निर्णय घेता येत नाही. पक्षप्रमुख जो आदेश देतील तोच सर्वांना मान्य असतो याचीही आठवण राऊतांनी यावेळी करुन दिली आहे.

यशवंत सिन्हा हे विरोधीपक्षाचे उमेदवार आहे. त्यांच्याबद्दलही आमच्या सदभावना आहे. विरोधी पक्ष टिकावा अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे एक लोकभावना काय आहे, हे जाणून निर्णय घेतला आहे. याआधी प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. प्रतिभाताई या महाराष्ट्राच्या राष्ट्रपती होत्या. प्रणव मुखर्जी यांनाही आम्ही पाठिंबा दिला होता. त्यावेळी शिवसेना ही एनडीएमध्ये होती, असंही राऊत यांनी सांगितलं