अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? नारायण राणेंचा शिवसेनेला सवाल

मुंबई – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत (sanjay raut) दिल्लीत होते. याचदरम्यान संजय राऊतांच्या मालमत्तांवर ईडीनं टाच आणली. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राजकारणात खळबळ उडाली असून यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. खुद्द शरद पवारांनी (Sharad pawar) देखील बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर  संजय राऊतांचे जोरदार स्वागत मुंबई विमानतळावर करण्यात आले.

विमानतळावर शिवसेनेचे आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवसैनिकांनी यावेळी ढोल ताशा वाजवत राऊतांचं स्वागत केलंय. खरतर संजय राऊत याचं हे अशा पद्धतीने का स्वागत केले गेले हा अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता मात्र यामागे शिवसेनेला केवळ शक्तिप्रदर्शन करायचं होतं असं दिसतंय.

दरम्यान, याच मुद्द्यावर आता भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?, असा सवाल करत नारायण राणे यांनी काळा पैसा मिळवायचा आणि कारवाई झाली की बोंबलायचं. त्यानंतर केलेली पाप झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा?, असा प्रश्न नारायण राणे यांनी केला आहे. संजय राऊत यांचं लक्ष मुख्यमंत्रीपदावर आहे की, पक्षप्रमुखपदावर?, असा खोचक सवाल नारायण राणेंनी केला आहे.