शिवसेनेला तगडा धक्का; मातब्बर नेत्याने दिला राजीनामा; आणखी काही नेते राजीनामा देण्याच्या तयारीत

 मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray) हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, बंडखोर शिंदे गटाच्या व्यूव्हरचनेला निष्पभ्र करण्यासाठी तसेच शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि तमाम शिवसैनिक मैदानात उतरले आहेत.या सर्व घडामोडींमुळे शिवसेनेच्या दोन गटात मोठा संघर्ष निर्माण झाला आहे.

दरम्यान, आता शिवसेनेच्या अडचणी आणखी वाढू लागल्या आहेत. कारण ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. महाविकास आघाडीसोबत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर गेली अडीच वर्षे शिवसेनेची ‘राष्ट्रवादी’ गळचेपी चालली असून त्याचा निषेध म्हणून आपण जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याचे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे आणखी काही नेते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे देखील सांगितले जात आहे. म्हस्के यांनी दिलेला राजीनामा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.