अण्णा भाऊ साठेंच्या फकीरावर लवकरच चित्रपट करणार – प्रविण तरडे

-लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृत्ती दिनानिम्मित अभिवादन व व्याख्यानाचे आयोजन -

पुणे  – साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची अजरामर ,साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरणारी साहित्य कृती फकीरा या कादंबरीवर लवकरच चित्रपट निर्माण करणार असल्याची घोषणा निर्माता,दिग्दर्शक व सुप्रसिद्ध अभिनेते प्रविण तरडे यांनी आज केली. अण्णा भाऊ साठे यांचा आज स्मृत्ती दिन होता त्यानिमित मातंग एकता आंदोलनाच्या वतीने नेहरू स्टेडियम येथे आज अभिवादन व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी तरडे बोलत होते .

 पुढे ते म्हणाले की ,अण्णा भाऊ अतिशय प्रतिभावान साहित्यिक होते समाजातील उपेक्षित माणसाला त्यांनी साहित्यात नायक बनविले. एवढ्या मोठ्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही तो मिळाला असता तर ज्ञानपीठ पुरस्काराची उंची वाढली असती असे परखड मत तरडे यांनी मांडले . यावेळी आतिशय गरीब आणि हालाखीच्या परिस्थितीत दहावी व बारावी मध्ये चांगले यश मिळवले अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि रोख परितोषक देऊन प्रविण तरडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
 सभेच्या अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष श्री. रमेश बागवे यांनी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचे कार्य सांगितले, तसेच आजच्या तरुण पिढीने फकिरा चा स्वाभिमान शिकला पाहिजे तसेच अण्णा भाऊ साठे यांचा विचार आत्मसात केला पाहिजे, असे ते म्हणाले .
यावेळी मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक अविनाश बागवे , मातंग समाजाचे जेष्ठ नेते अंकल सोनवणे ,अनिल हतागळे,विठ्ठल थोरात ,सुरेखा खंडागळे, ॲड. राजश्रीताई अडसूळ ,रवी पाटोळे यासह मातंग एकता आंदोलनांचे राज्य व शहर पदाधिकारी ,कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल थोरात यांनी केले, आभार संजय साठे यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन  अरुण गायकवाड यांनी केले.