‘नरहरी झिरवळांचा खेळ आता संपला आहे, आता यापुढे…’ 

Maharashtra Political crises –   महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील चर्चा आणि सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून त्याची उत्सुकता महाराष्ट्राबरोबरच अवघ्या देशाच्या राजकीय वर्तुळाला लागलेली आहे. यासंदर्भात न्यायालय नेमका काय निर्णय देणार? याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या निकालाच्या आधी राज्यातील राजकीय वातावरण तापले असून अनेक दावे- प्रतिदावे केले जात आहेत. यातच  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी यासंदर्भात सूचक ट्वीट केले होते. “काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ असं म्हणत त्यांनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, यावरून आता शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी राऊतांना चिमटा काढला आहे.

नरहरी झिरवळांचा खेळ आता संपला आहे. आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत. जर आज विधानसभेचे अध्यक्ष नसते, तर कदाचित १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झिरवळ यांच्याकडे आला असता. त्यावेळी नरहरी झिरवळ यांनी त्यांचं काम केलं, यापुढे राहुल नार्वेकर त्यांचं काम करतील”, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.