नवाब मलिकांचा मुलगा ईडीच्या रडारवर? कोट्यावधींचा गैरव्यवहार झाल्याचे आले समोर

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयला एनसीबीने अटक केली होती. परंतु जावयाला न्यायालयाने दिलासा दिला आहे. परंतु आता नवाब मलिकांच्या मुलाच्या मागे ईडीचा ससेमीरा लागला आहे. सोमवारी मुबंईतील पाच ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. मलिकांच्या मुलाच्या कंपनीत गैरव्यवहार झाला असल्याचे समोर आले असल्यामुळे ईडीने कारवाई सुरु केली आहे. एका राष्ट्रीयकृत बँकेची १४९.८९ कोटी रुपये फसवणूकीप्रकरणी ईडी कारवाई करत आहे.

ज्याठिकाणी छापेमारी करण्यात आली त्या ठिकाणांमध्ये असोसिएट हाय प्रेशर टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या संचालकांची घरे आणि कार्यालयांचा समावेश आहे. दिल्लीत या संदर्भात प्रथम ईसआयआर नोंदवण्यात आली होती. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, बँकेकडून कर्ज घेतलेली काही रक्कम कथितपणे महाराष्ट्रातील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीकडे वळवण्यात आली होती.

फराज मलिकशी संबंध असलेल्या कंपनीला आरोपींनी घेतलेल्या कर्जाच्या रकमेतून १० कोटींहून अधिक रक्कम मिळाल्याचा आरोप आहे. जर तपास यंत्रणेला युनियन बँकेच्या कर्जातून गैरवापर केलेला निधी फराज मलिकशी संबंधित कंपनीकडे वळवल्याचा पुरावा सापडला तर त्याला चौकशीचा भाग म्हणून चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

असोसिएट हाय प्रेशर टेक्नॉलॉजीकडून नफा मिळवण्यासाठी हे पैसे चुकीच्या पद्धतीने इतर कंपन्यांमध्ये वळवण्यात आले. यामुळे युनियन बँक ऑफ इंडियाचे तब्बल १४९.८९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार बँक प्रशासनाकडून करण्यात आली आहे असे सांगण्यात येत आहे.