मुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यक्रमापेक्षा गौतमीच्या कार्यक्रमाला जास्त गर्दी असते; राष्ट्रवादीच्या आमदाराचा टोला

नृत्यांगणा गौतमी पाटील हिने गेल्या काही महिन्यांतच भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे. महाराष्ट्रात तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते. लोक अगदी जागा मिळाली नाही तर झाडांवर, भिंतीवर, मिळेल तिथे जाऊन तिचा डान्स पाहताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील (Dilip Mohite Patil) यांनी वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या (CM Eknath Shinde) कार्यक्रमाला एवढी गर्दी नसते जेवढी गर्दी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला असते, असं विधान करत दिलीप मोहिते-पाटील यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

एका कार्यक्रमामध्ये बोलताना दिलीप मोहिते-पाटील म्हणाले, “गौतमी (Gautami Patil) अत्यंत गरीब परिस्थितीतून आली आहे. ती तिच्या कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस अधिकारी तिच्या कार्यक्रमावर बंदी घालतात. मात्र, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी जमत नाही जेवढी तिच्या कार्यक्रमांना जमते.”

“गौतमी ट्रोल होत आहे, हे मला माहित आहे. ती एक कलाकार आहे. ती एक नवीन कलाकार आहे. तिची कला थांबवू नका आणि त्याचबरोबर इतक्या लवकर तिचं आयुष्य संपवू नका, अशी माझी समाजाला विनंती आहे,” असे त्यांनी पुढे बोलताना म्हटले.