एकनाथ शिंदेंचा वापर करुन शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव आहे; निखील वागळे यांचा आरोप

मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुरुवारी एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली. यासोबतच विरोधी विचारसरणीच्या पक्षांशी युती केल्यामुळे गेल्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना केडरकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी केला. या सर्व कारणांमुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. दरम्यान, आमदारांसोबतच आता खासदारही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनार्थ येताना दिसत आहेत.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी भाजपला या सर्व घडामोडींवरून लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, एकनाथ शिंदेंचा वापर करुन शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव आहे. पण कोणताही पक्ष असा संपत नसतो. शिवसेना तात्पुरती जखमी होईल, पण संपणार नाही.