लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये खांदेपालट; 4 प्रदेशाध्यक्ष बदलले

BJP State President News: लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी म्हणून भाजपने मंगळवारी (4 जुलै) चार राज्यांतील अध्यक्ष बदलले आहेत. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांची तेलंगणाच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री डी. पुरंदेश्वरी यांच्याकडे आंध्र प्रदेश, माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांच्याकडे झारखंड आणि सुनील जाखड यांच्याकडे पंजाबमध्ये पक्षाची कमान सोपवण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनवण्यात आले आहे. एप्रिलमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेलंगणामधील भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी एटाला राजेंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या नियुक्त्या निश्चित केल्या आहेत आणि त्या तत्काळ प्रभावाने लागू होतील.

केंद्रीय मंत्रिपरिषदेत फेरबदलाच्या शक्यतेबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (३ जुलै) केंद्रीय मंत्रिपरिषदेची बैठक घेतली . लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतलेल्या भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वापुढे बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष या बैठकांमध्ये सहभागी झाले होते. तिन्ही नेत्यांनी 28 जून रोजी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता हे बदल करण्यात आले आहेत.