सरकारचा पाठिंबा कुणी काढून घेतलेला नाही ;सरकार अजूनही अस्तित्वात, कामकाज सुरू – जयंत पाटील 

मुंबई  –  अजून अधिकृतपणे सरकारचा पाठिंबा कुणी काढून घेतलेला नाही त्यामुळे सरकार अस्तित्वात आहे, सरकारचं कामकाज सुरू आहे. प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्यांचा परिणाम होण्याची आवश्यकता नाही त्यामुळे सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे असं चित्र नाही अशी स्पष्ट माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

जे आमदार गुवाहटीला गेले आहेत त्यापेक्षा वेगळं काही महत्व यामध्ये नाही असे सांगत जयंत पाटील यांनी शिवसेना आमदारांच्या बंडाची हवाच काढून टाकली. राष्ट्रवादीसोबत नको अशी भूमिका शिवसेना आमदारांची आहे असे प्रसारमाध्यमातून पहात आहोत. त्यांना वेगळं व्हायचं असेल तर काही कारणं द्यावी लागतात त्याप्रमाणे ते कारणं देत आहेत आम्हीही अशी कारणं देऊ शकतो मात्र आम्ही अशी कारणं देणार नाही. सरकारमधून बाजुला होण्यासाठी किंवा महाविकास आघाडीतून बाजुला होण्यासाठी अडीच वर्ष एकत्र राहिल्यावर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुरू असताना अशाप्रकारची कारणं देणं चुकीचं असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

बंडखोर शिवसेना आमदारांनी पाठिंबा काढला आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सरकारचा पाठिंबा कुणी काढलाय त्यांची नाराजी सुरू आहे. सरकारचा पाठिंबा कुणी काढलेला नाही. तुम्ही पाठिंबा काढायला उद्युक्त का करताय असा उलट सवाल जयंत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींनी केला. शिवाय त्यांनी पाठिंबा काढला असेल तर कागद दाखवा. ते आपलं मत व्यक्त करत आहेत. एकनाथ शिंदे यांचा जय बोलत आहेत. एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे यामध्ये वेगळं काही आहे असं वाटत नाही. जे गेले आहेत ते परत येतील. उध्दव ठाकरे यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे सरकारचा पाठिंबा कुणी काढून घेत नाही तोपर्यंत सरकारला कोणतीही भीती आहे असं वाटत नाही असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

अशापध्दतीने बोलणार्‍या नारायण राणे यांना कितीतरी वेळा पवारसाहेबांनी त्यांच्या संकटकाळात सहकार्य, पाठिंबा व आधार देण्याचे काम केले आहे याचे स्मरण जरी त्यांनी केले तरी त्यांना वाटेल आपण केलेले विधान मागे घ्यावे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.