पुणे : हर्बल तंबाखूची एका बाजूला चर्चा सुरु असताना आता दुसऱ्या बाजूला आरोग्याला हानिकारक नसणाऱ्या आयुर्वेदिक सिगरेट संशोधनाला पेटंट मिळाले आहे. खरतर धूम्रपानाचे अनेक तोटे आहेत. डॉक्टर धूम्रपान न करण्याचा सल्ला डॉक्टर सगळ्यांनाच देतात. मात्र आता धूम्रपानाच्या व्यसनात अडकलेल्या व्यक्तींना आयुर्वेदिक धूमपानाचा पर्याय देऊन व्यसनाधीनतेकडून आरोग्यसंपन्नतेकडे नेणाऱ्या आयुर्वेदिक सिगरेट विकसित करण्यात आली आहे. आणि या अनंतवेद आयुर्वेद संशोधनालयाच्या संशोधनाला भारतीय पेटंट देखील मिळाले आहे.
पुण्यातील अनंतवेद आयुर्वेद गेल्या अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक क्षेत्रात संशोधन करत आहेत. आयुर्वेदिक सिगारेट वर तीन पिढ्यांनी अथकपणे सलग 10 वर्ष याबाबत संधोधन केले आहे. धूम्रपानाच्या व्यसनात अडकलेल्या व्यक्तींना आयुर्वेदिक धुमपानाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो, व्यसनाधीनतेकडून आरोग्य संपन्नतेकडे नेणारे हे संशोधन असल्याचे संशोधक डॉ. राजस नित्सुरे यांनी ही माहिती दिली आहे.
तंबाखूयुक्त धूम्रपानाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी व्यसनाधीन व्यक्तींना आयुर्वेदिक औषधी घटकांचा समावेश असलेली सिगारेट उपलब्ध करून दिल्यास त्यांची व्यसनातून मुक्तता होऊ शकते. तसेच निकोटीन, कार्बनसारख्या घटकांमुळे होऊ शकणारे दुष्परिणाम टाळून त्यांना आरोग्यसंपन्न बनविणे शक्य होऊ शकते; या दृष्टीकोनातून वैद्य अनंत नित्सुरे आणि त्यांचे पुत्र वैद्य उदय नित्सुरे यांनी संशोधन सुरू केले. आयुर्वेदिक औषधांच्या संशोधनात रस घेऊन ‘बीएएमएस’बरोबरच औषधनिर्माण शास्त्रातील पदवी धारण करणारे त्यांचे नातू डॉ. राजस नित्सुरे यांनी हे संशोधन पूर्णत्वास नेऊन आयुर्वेदिक सिगरेटच्या विकसनाला पेटंट प्राप्त केले आहे.
‘धूमपान’ ही समृद्ध भारतीय आयुर्वेद परंपरेची मौलिक देणगी असून ती विकृत कफ आणि गळ्याच्या वरच्या भागातील विकारांवर उपचारांसाठी प्रभावी पद्धती आहे. तसेच विशेषतः श्वसनाशी संबंधित, छाती, फुप्फुसे आणि मानसिक तणाव अशा विकारांसाठी त्याचा परिणामकारक वापर करता येतो, असा दावा डॉ. नित्सुरे यांनी केला.
पहा व्हिडीओ –